महिला लष्करी अधिकार्‍यांची शौर्यगाथा!   

भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने नुकत्याच झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. या कारवाईनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासमवेत दोन महिला लष्करी अधिकारी होत्या. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग. व्यावसायिक पद्धतीने त्यांनी जगापुढे भारताचे सैनिकी शौर्य मांडले आणि पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवाद्यांना आश्रय असल्याचे ठोस पुरावे सादर केले. त्यांच्या स्पष्ट, आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने देशवासीयांची मने जिंकली आणि अनेकांच्या मनात या धाडसी महिलांबद्दल कौतुक आणि कुतूहल निर्माण झाले.

स्वप्नांची उंच भरारी

तू व्योमिका म्हणजे आकाश तुझे आहे, हे सहावीत ऐकलेले वाक्य व्योमिका यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरले. त्याच दिवशी त्यांनी पायलट होण्याचे ठरवले  आणि ठरवलेले स्वप्न सत्यात उतरवलेदेखील. आज त्या एक कुशल हेलिकॉप्टर पायलट असून, भारतीय हवाई दलात विंग कमांडर म्हणून देशसेवा करत आहेत. २५०० पेक्षा अधिक उड्डाण तास आणि जम्मू-काश्मीर ते ईशान्य भारतातील दुर्गम भागात केलेली बचाव मोहीम ही त्यांच्या धैर्याची साक्ष देतात. २०२० मध्ये अरुणाचल प्रदेशातील बिकट हवामानात नागरिकांचे प्राण वाचवणार्‍या याच व्योमिका आहेत. त्यांचे पतीही हवाई दलात पायलट आहेत आणि हे ‘पायलट जोडपं’ देशासाठी आकाशातील सीमेवर लढत असते.
 
सोफिया कुरेशी या मूळच्या गुजरातच्या आहेत. त्यांचा जन्म १९८१ मध्ये वडोदरा येथे झाला. सोफियांचे आजोबादेखील सैन्यात होते. सोफिया १९९९ मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाल्या. १९८९ मध्ये चेन्नई येथे त्यांनी प्रशिक्षण घेतले. २०१० पासून त्या शांतता मोहिमेशी संबंधित आहेेत. पंजाब सीमेवरील ऑपरेशन पराक्रम दरम्यान तिच्या सेवेबद्दल त्यांना जनरल ऑफिसर कमांडिंग इन चिफ म्हणून प्रशंसा पत्र मिळाले. त्यांच्या अनेक चांगल्या कामाची दखल घेतली गेली.
 
कर्नल सोफिया कुरेशी यांचे संपूर्ण कुटुंब लष्कराशी निगडित. आजोबा, वडील, आणि आता त्या स्वतः. त्यांच्या आईने त्यांच्या दोघी बहिणींना सैन्यात जाण्याचे स्वप्न दाखवले आणि कुरेशींनी ते साकार केले. कारगिल युद्धाच्या काळात त्यांनी प्रशिक्षण घेतले आणि २०१७ मध्ये त्यांनी सांगितले, लष्करात जाणे हे एक सन्माननीय कर्तव्य आहे. २००६ मध्ये त्यांनी संयुक्त राष्ट्रांतर्गत काँगोमध्ये सैनिकी निरीक्षक म्हणून प्रतिनिधित्व केले. या वर्षीच्या ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती देताना, त्यांनी स्पष्ट हिंदीत पाकिस्तानच्या भूमीवरच्या दहशतवादी गडांबद्दल ठोस माहिती दिली. त्यांच्या आई आणि भावाने त्यांच्या कार्यगौरवाबद्दल व्यक्त केलेला आनंद आणि अभिमान सर्व पालकांसाठी प्रेरणादायक आहे.

धैर्य, दृढनिश्चय आणि देशप्रेम

या दोघी अधिकारी केवळ लष्करी यशासाठी नव्हे, तर महिला सक्षमीकरणासाठी प्रेरणा ठरतात. त्यांनी सिद्ध केले की, लष्कर हे केवळ पुरुषांचे क्षेत्र नाही; योग्य प्रशिक्षण, आत्मविश्वास आणि राष्ट्रभक्ती असलेल्या स्त्रियादेखील समोरच्या रांगेत नेतृत्त्व करू शकतात. आज, जेव्हा संपूर्ण देश त्यांच्या धैर्याला सलाम करत आहे, तेव्हा याच महिला अधिकार्‍यांनी सांगितलेली ही कथा अनेक तरुणींना त्यांच्या ध्येयांच्या दिशेने उंच भरारी घेण्याची प्रेरणा देईल. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांना त्रिवार सलाम.

 प्रा. विजय कोष्टी, कवठे महांकाळ (जि. सांगली)

Related Articles